स्थानिक

पालखी मार्गावरील निकृष्ट दर्जाचे काम झालेल्या काही पथदिव्यांमुळे अपघाताची भीती अद्यापही कायम,अनेक खांब तसेच उभे. वाऱ्याच्या वेगामुळे थरथरणारे खांब पाहून नागरिक जातात जीव मुठीत धरून

आमदार आणि नगराध्यक्षांनी सूचना करून पण अनेक नवीन खांब तसेच उभे

फलटण(नसीर शिकलगार ):—–  फलटण नगरपालिका हद्दीतील पालखी मार्गावर १५ दिवसांपूर्वी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पथदिव्याचा खांब कोसळून दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच, अद्यापही या मार्गावर मृत्यूचे सापळे उघडेच आहेत. आमदार आणि नगराध्यक्षांनी स्पष्ट सूचना देऊनही विद्युत विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समोर येत असून, निकृष्ट दर्जाचे काम झालेले सर्व खांब हटवून नव्याने मजबूत खांब उभारण्याची जोरदार मागणी होत आहे.

आमदार, नगराध्यक्षांच्या सूचनांना केराची टोपली!,प्रशासनाचा बेजबाबदारपणा:…….

१५ दिवसांपूर्वी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा होती. मात्र, लोकप्रतिनिधींनी आदेश देऊनही काही भागातील विद्युत विभागाने खांब हटवण्याची तसदी घेतलेली नाही. शासकीय विश्रामगृह ते गिरवी नाका तसेच माळजाई परिसरातील नव्याने उभारण्यात आलेले पथदिवे अद्याप तसेच आहेत जरा जोरात वारे सुटले तर खांब हलताना  दिसतात त्यामुळे येणारे जाणारे नागरिक खांबाकडे बघत जीव मुठीत धरून जात आहेत.

 अन सत्ताधारी नेते मंडळी झाली होती आक्रमक…..

 पंधरा दिवसांपूर्वी भर रविवारच्या बाजारात शासकीय विश्रामगृहासमोरील पथदिव्याचा खांब पडून दोन जण जखमी झाले होते. नव्याने बसवलेले पथदिवे निकृष्ट फाउंडेशन चे काम झाल्याने आपोआप पडले होते. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप सुरू झाले होते आमदार सचिन पाटील, नराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी संबंधित ठेकेदाराविरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन सर्व खांब तातडीने काढून सर्व ठिकाणचे फाउंडेशन काम मजबूत आणि दर्जेदार करूनच नवीन खांब बसविण्याचे आदेश दिले होते. अचानक नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी रात्रीचे फिरून खांब काढायला लावले होते. मात्र एसटी स्टँड परिसर सफाई कॉलनी परिसर आणि शासकीय विश्रामगृहासमोरील खांब हटविण्यात  आले.मात्र बाकीचे खांब तसेच उभे असून अनेक जणांना हे खांब पाहून पोटात गोळा येत आहे. सदरचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभाग यांच्या देखरेखाली झाले होते. नंतर काम पूर्ण होताच या कामांचे हस्तांतर नगरपालिकेकडे होणार होते मात्र कामे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे लक्षात येताच सत्ताधारी गटाचे नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी ठेकेदाराविरोधात आवाज उठविला आमदार सचिन पाटील यांनी पण आक्रमकपणे निकृष्ट  दर्जाच्या कामावर बोट ठेवले. तर दुसरीकडे  विरोधी शिवसेनेचे नेते निलेश तेलखडे यांनी सुद्धा जोरदार आवाज उठवून सत्ताधारी गटावर टक्केवारीचे आरोप केले होते. यामुळे फलटणचे राजकारण आरोप प्रत्यारोपामुळे चांगले ढवळून निघाले होते दोन दिवसात सर्व थंड झाल्यावर राजकीय नेते मंडळी या घटना विसरून गेले याचा संबंधित ठेकेदाराने फायदा उचलीत काही ठिकाणचे खांब तसेच ठेवले आहेत. खुद्द प्रांताधिकारी यांचे निवासस्थानसमोरील खांब तसेच आहेत. 

 अद्यापही खांब थरथरतात…… 

वाऱ्याचा किंचितसा वेग वाढला तरी हे खांब थरथर कापत थरथरतात. या मार्गावरून ये-जा करताना भीषण अपघाताच्या भीतीपोटी वाहनधारक आणि पादचाऱ्यांचा जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

अधिकारी कोणाच्या अपघाताची वाट पाहत आहेत?:……..

 सार्वजनिक बांधकाम खात्याचा (विद्युत विभाग) हा मनमानी कारभार पाहता, ते आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.”पालखी मार्गावरील निकृष्ट दर्जाचे आणि हलणारे सर्व पथदिव्यांचे खांब तात्काळ काढून टाकावेत. त्याठिकाणी उच्च दर्जाचे, मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे नवीन खांब बसवण्यात यावेत.अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button