फलटण: फलटण तालुक्यात दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालली असून, संपूर्ण तालुका सध्या पाण्याच्या थेंबाथेंबासाठी मोहताद झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य इतके वाढले आहे की, फलटण शहरात आता ‘दिवसआड’ पाणीपुरवठा करण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. नागरिकांच्या तोंडाचे पाणी पळालेले असतानाच, दुसरीकडे मात्र व्यावसायिक बांधकामांसाठी पाण्याचा अपव्यय सुरू असल्याने जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘लोकांना प्यायला पाणी नाही आणि बांधकामांना कशाला?’ असा संतप्त सवाल करत शहरातील सर्व बांधकामे तात्काळ थांबवण्याची आक्रमक मागणी जनतेतून आता जोर धरू लागली आहे.
तालुक्यात वळिवचा पाऊस पण मोठा न झाल्याने पाण्याचे स्त्रोत कोरडे पडत चालले आहेत.फलटण नगरपालिकेने शहरात दिवसआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
एकीकडे सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत असताना, दुसरीकडे मोठ्या इमारतींच्या आणि व्यावसायिक बांधकामांवर लाखो लिटर पाणी सर्रास उडवले जात आहे. हा पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी शहरातील सर्व बांधकामे तात्काळ प्रशासनाने बंद पाडावीत, अशी मागणी जनतेने लावून धरली आहे.
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील परिस्थिती तर अत्यंत विदारक आहे. विहिरी आणि कूपनलिका (बोरवेल) तळ गाठल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक भागात टँकर सुरू आहेत. पाण्याचे स्त्रोत दिवसेंदिवस कमी होत असलेले पुढे काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या भागात टंचाईचे दहाकता जास्त जाणवत आहे तेथे रोजगार हमी योजनेची कामे तातडीने सुरू करण्याची गरज आहे. जेवढे पाण्याचे स्त्रोत तालुक्यात आहेत ते ते राखीव ठेवण्याची गरज आहे ज्या ज्या भागात बांधकामे सुरू आहेत तेथे काही काळ बांधकामे थांबवण्याची गरज आहे. जनता मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.