फलटण: महावितरणने फलटण शहरासह ग्रामीण भागात ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचा धडाका लावल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्यातच, “पुढील ४८ तासांत तुमचे जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवले जाईल,” अशा आशयाचे कडक मेसेज थेट नागरिकांच्या मोबाईलवर धडकत असल्याने जनतेत भीती आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जनतेची ही लूट आणि मानसिक छळ सुरू असताना फलटणमधील एकही प्रमुख राजकीय पक्ष किंवा नेता जनतेच्या बाजूने ठामपणे उभा राहताना दिसत नसल्याने, “आमचे वाली कोण?” असा उद्विग्न सवाल फलटणकर विचारत आहेत.
मोबाईलवरील त्या एका मेसेजने उडवली झोप!
गेल्या दोन दिवसांपासून फलटणमधील वीज ग्राहकांच्या मोबाईलवर महावितरणकडून धमकावणारे मेसेज येत आहेत. कोणतीही पूर्वकल्पना न देता, ग्राहकांना विश्वासात न घेता थेट ४८ तासांचा अल्टिमेटम दिल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात भरमसाठ वाढ होणार, प्रीपेड रिचार्ज संपल्यास रात्री-अपरात्री वीज गुल होणार, अशा भीतीने सामान्य मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांची झोप उडवली आहे. महावितरणचा हा कारभार म्हणजे निव्वळ ‘सुलतानी फर्मान’ असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
जनतेची लूट सुरू, पण लोकप्रतिनिधी गप्प का?
निवडणुका आल्या की गल्लोगल्ली मते मागण्यासाठी फिरणारे फलटणचे सर्वच पक्षाचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आज या गंभीर मुद्द्यावर मूग गिळून गप्प का आहेत? असा संतप्त सवाल जनता करत आहे. सत्ताधारी असो की विरोधक, जनतेच्या खिशावर मारल्या जाणाऱ्या या दरोड्याविरोधात कोणताही पक्ष रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करताना दिसत नाहीये. किंवा कोणी विरोधपण करताना दिसत नाही.राजकीय नेत्यांच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महावितरण कडून पण कसलीच जनजागृती होत नसल्याने नागरिक संभ्रमामध्ये आहे.
नागरिकांचा आक्रमक पवित्रा
“आम्ही कोणत्याही परिस्थितीत आमच्या घरात स्मार्ट मीटर लावू देणार नाही! महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विनंती करून परत लावू. जर नेत्यांना आमची काळजी नसेल, तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून या सक्तीला चोख उत्तर देऊ!”अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.