स्थानिक
फलटण नगर परिषदेत शिस्तीचा नवा ‘ड्रेस कोड’! सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लवकरच गणवेश बंधनकारक; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती

फलटण: फलटण नगर परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात अधिक व्यावसायिकता, शिस्त आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. फलटण नगर परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आता ‘ड्रेस कोड’ (अधिकृत गणवेश) लागू करण्यात येणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.
या निर्णयामुळे नगर परिषदेत येणाऱ्या नागरिकांना अधिकारी आणि कर्मचारी कोण आहेत, हे ओळखणे सोपे होणार असून प्रशासनाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी विविध विभागांमध्ये फिरावे लागते. गणवेशामुळे कर्मचाऱ्यांची ओळख तत्काळ पटणार असल्याने नागरिकांची गैरसोय टळेल.
नगर परिषदेचा कारभार कॉर्पोरेट धर्तीवर अधिक शिस्तबद्ध आणि सुटसुटीत दिसावा, हा या निर्णयमागील मुख्य उद्देश आहे.सर्व स्तरांवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ठराविक ड्रेस कोड पाळावा लागणार असल्याने कार्यालयात एकसमानता आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल.
“फलटण नगर परिषद ही नेहमीच लोकहिताच्या आणि नाविन्यपूर्ण निर्णयांसाठी ओळखली जाते. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि शिस्त असणे अत्यंत गरजेचे आहे. नगर परिषदेत येणाऱ्या नागरिकांना तात्काळ आणि योग्य सेवा मिळावी, तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये एक शिस्तबद्धता दिसावी यासाठी हा ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

