क्राईम

बनावट मूल्यांकनाचा महाघोटाळा! फलटणमधील नामांकित ८ बिल्डरांवर गुन्हा दाखल, ३ जणांना बेड्या तर ५ जण फरार! गुंतवणूकदार हादरले

फलटण:–शासकीय तिजोरीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करत बनावट मूल्यांकन दाखल्याद्वारे शासनाची उघड-उघड फसवणूक करणाऱ्या फलटणमधील ८ बड्या बिल्डरांचा पर्दाफाश झाला आहे! याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी धडक कारवाई करत ३ संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर ५ जण फरार झाले आहेत.

शासकीय शिक्क्याचा बनावट वापर!

मौजे कोळकी (ता. फलटण) येथील गट नंबर ७९/१/१, ७९/१/५ आणि ८०/१ या जमिनी वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यासाठी संशयित आरोपी रणधीर धनसिंगराव भोईटे याने इतर जमीनधारकांशी संगनमत करून दुय्यम निबंधक कार्यालयाचा बनावट मूल्यांकन दाखला सादर केला. या दाखल्याच्या आधारे जमिनीचे मूल्यांकन ३५ लाख १ हजार रुपये दाखवून ५०% प्रमाणे अवघे १७ लाख ५१ हजार रुपये शासकीय तिजोरीत भरले आणि जमीन वर्ग-१ करून घेतली.

तक्रार होताच भांड उघडं, लाखो रुपयांची तफावत!

एका तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयाने सदर दाखला बनावट असल्याचा अहवाल दिला. नवीन मूल्यांकन केले असता जमिनीचे खरे मूल्य ७६ लाख ५९ हजार रुपये असल्याचे समोर आले! म्हणजेच शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचा कट रचण्यात आला होता.

तहसीलदारांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल!

तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या आदेशानुसार निवासी नायब तहसीलदार अभिजित अशोक सोनवणे यांनी फलटण शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार रणधीर धनसिंगराव भोईटे, विक्रम महादेवराव झांजुरणे, राजेंद्र सदाशिव कापसे, निखील रामदास देवकर, प्रविण ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, रामचंद्र ज्ञानेश्वर नाईक निंबाळकर, अभिजित तुकाराम इंगळे आणि विरेंद्र विक्रम झांजुरणे या ८ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

३ जणांना ४ दिवसांची पोलीस कोठडी!

याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत रणधीर भोईटे, विक्रम झांजुरणे आणि राजेंद्र कापसे या तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित ५ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

गुंतवणूकदार आणि फ्लॅट धारक हादरले

दरम्यान यापूर्वी यांच्याकडून ज्यांनी जागा घेतल्या, फ्लॅट घेतले ते गुंतवणूकदार आणि फ्लॅट धारक हादरले असून आपल्याला पण फसवले गेले? तर नाही ना अशा शंका कुशंका त्यांच्या मनात येऊ लागल्या आहेत. अनेक जण आता व्यवहाराची चौकशी करू लागले आहेत.

दरम्यान आठ बिल्डरांवर गुन्हा दाखल झाल्याने संपूर्ण फलटण तालुक्यात खळबळ माजली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button