फलटण{नसीर शिकलगार }- फलटण पंचायत समितीवर भाजपचा प्रथमच सत्तेचा झेंडा फडकला असून राजकारणातील महत्त्वाचे स्थान असलेली आमदारकी नगरपालिका आणि पंचायत समिती यावर सत्ता मिळवीत माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजकारणातील इजा बिजा तीजा पूर्ण केला आहे. लोकसभेला पराभव पत्करून पण त्यांनी नंतर मिळवलेले यश पाहता कार्यकर्ते हारकर जितने वाले को रणजितदादा कहते अशा प्रतिक्रिया देत आहेत.

फलटण तालुक्यातील एकंदरीत गेल्या दोन वर्षातील राजकारणाचा विचार करता गेली तीस वर्षाहून अधिक काळ विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती असलेली सर्व सत्ता स्थाने मागील दोन वर्षात ताब्यात घेण्याचा सपाटा भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुरू केला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता मात्र हा पराभव विसरून ते दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले होते. त्यांनी जोपर्यंत आमदारकी, नगरपालिका आणि पंचायत समितीची सत्ता हातात येत नाही तोपर्यंत कसलाही सत्कार स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यांनी केलेला पण सुरुवातीला कितपत यशस्वी होतो असे वाटत होते मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विशासू सहकारी सचिन पाटील यांना तिकीट देऊन त्यांना निवडून आणले त्यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासह नगरपालिकेची सत्ता हाती ठेवली आहे या नंतर झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे पाच व राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन तर विरोधातील शिवसेनेचे आठ सदस्य निवडून आले होते त्यामुळे पंचायत समितीवर समान बलाबल झाल्याने सत्ता कुणाची येणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती.
ईश्वरी चिट्टी द्वारेच कौल येईल अशा अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत असताना त्यांनी आज सकाळीच परिपक्व राजकारणाचे दर्शन घडवीत त्यांच्या माध्यमातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला. त्याचबरोबर विश्वासू सहकाऱ्यांना शिवसेनेच्या नेत्यांबरोबर चर्चा करायला लावून त्यांना उपसभापती पदाची ऑफर दिली. त्यामुळे सभापतीपदी भाजप व उपसभापतीपदी शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. आतापर्यंत तीस वर्षाहून अधिक काळ पंचायत समितीवर आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हाती असलेली सत्ता ताब्यात घेत प्रथमच पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. आमदारकी नगरपालिका व पंचायत समितीची सत्ता या तीनही महत्त्वाच्या सत्ता रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या हाती घेत तालुक्याच्या राजकारणात वर्चस्व सिद्ध केले आहेत पण भाजपच्या वरिष्ठ पातळीत त्यांचे स्थान अधिक उंचावणार आहे.
भाजपची सत्ता आल्याने कार्यकर्ते खुश असले तरी त्यांनी या यशामागे असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या जिद्दीला आणि परिश्रमाला दाद देत हारकर जितने वाले को रणजीतदादा कहते है अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Back to top button
