स्थानिक
कोळकी रस्त्यावर बसवलेले नवीन खांब निकृष्ट कामामुळे आत्ताच वाकडे झाले, नागरिकांच्या जीवाला धोका
ना वादळ वारा ना पाऊस पण दर्जाहीन मटेरियलमुळे मोकळे खांब सुद्धा वाकडे झाले. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी
फलटण{नसीर शिकलगार }- फलटण शहरातून कोळकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर महावितरणने नवीन खांब बसवले असून वादळ वारा किंवा पाऊस नसताना सुद्धा नवीन विजेचे खांब काही दिवसांतच वाकडे झाल्याचे दिसत आहे. खांब लावताना कोणतेही नियम निकष न पाळता हलक्या दर्जाचे मटेरियल वापरल्याने वाकड्या झालेल्या खांबामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

फलटण ते दहिवडी रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर फलटण ते कोळकी रस्त्यावर जुने खांब बदलून त्या ऐवजी नवीन खांब बसविण्याची काम महावितरण मार्फत ठेकेदारी पद्धतीवर सुरू आहे. हे काम विस्तारित रस्त्यामुळे रस्त्याच्या कडेला बसवले जात असताना कोठेही कोणताही खांब बसवला गेला आहे. कोणत्याच खांबाची लाईन एका रेषेत दिसत नाही. खांब बसवताना महावितरणचे अधिकारी झोपेत होते काय असा प्रश्न सध्या नागरिक विचारत आहेत कारण एक ते दोन महिन्यात बसवलेले नवीन खांब वाकले गेलेले आहेत काही खांब वाकडे झालेले आहेत. नवीन बसवलेल्या काही खांबावर जड वजनाच्या तारा जोडलेल्या असून सध्या तीव्र उन्हाळा असल्याने वारे सुटत नाही तसेच अद्याप मुसळधार पावसाळा सुरू झालेला नसताना सुद्धा निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्यामुळे हे खांब आत्ताच वाकडेतिकडे झालेले आहेत. एवढेच काय ज्या खांबावर कसलाही लोड नाही आणि जे खांब सध्या मोकळे उभे आहेत ते सुद्धा वाकडे झालेले आहेत इतका हलका दर्जा कामाचा झालेला आहे.

सदरच्या रस्त्यावर दररोज हजारो नागरिक येजा करत असतात त्यामुळे एखादा खांब जर पडला तर येणाऱ्या जाणाऱ्या माणसांच्या जीवाला धोका संभवतो. मोठे वादळ वारे आले किंवा मोठा पाऊस झाला तरी हे खांब निकृष्ट दर्जामुळे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.
सदरचे काम एका बाहेरील कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आल्याचे समजते मात्र त्याने ते काम कसेही मटेरियल वापरून उरकलेले आहे. खांब वाकडे झाले काय आणि न झाले काय याचे त्याला काही देणे घेणे नसल्याचे दिसत आहे. महावितरणचे अधिकारी पाठीशी असल्याच्या अविर्भावात तो असल्याने त्याच्यावर कसलीच कारवाई होत नाही. महावितरणचे अधिकारी वाकडेतिकडे खांब बघून सुद्धा आंधळेपणाचे सोंग घेत आहे. सदरच्या रस्त्यावरील सर्व खांबांची पाहणी करून चांगल्या प्रतीचे नवीन खांब उभारायची आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

कोळकी रस्त्यावर बसवलेल्या खांबाची पाहणी आम्ही करणार असून जर निकृष्ट दर्जाचे काम असेल तर संबंधित ठेकेदाराकडून ते दुरुस्त करून घेतले जाईल.
— दिनेश जोनवाल { सहाय्यक अभियंता महावितरण फलटण शहर 1}



