स्थानिक

सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था’ मतदार संघातून भाजप तर्फे अनेकजण इच्छुक, भाजपची मतदार संख्या जास्त. महायुती आणि महाविकास आघाडीत निवडणूक रंगणार

भाजपसोबत राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र राहिल्यास एकतर्फी निवडणूक होणार

फलटण:- सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था’ मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून आत्तापर्यंत सांगली जिल्ह्याचे वर्चस्व या मतदारसंघावर राहिले होते मात्र यावेळी सातारा जिल्ह्याचे वर्चस्व राहावे व सातारा जिल्ह्यातील उमेदवार असावा यासाठी जिल्ह्यातील नेते मंडळींनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या वेळेस निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच होणार आहे. निवडणुकीच्या निमित्ताने जो आर्थिक बळ जास्त दाखवेल त्याचे पारडे जड राहणार आहे. 

 निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था’ मतदारसंघाचा समावेश आहे. या घोषणेमुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षांपासून या जागा रिक्त होत्या. निवडणूक जाहीर झाल्याने दोन्ही जिल्ह्यांतील नेते आणि इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडून मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत.

निवडणुकीची अधिसूचना २५ मे २०२६ रोजी निघणार आहे.उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत: १ जून २०२६ असून उमेदवारी अर्जांची छाननी: २ जून २०२६ आहे.

अर्ज मागे घेण्याची मुदत: ४ जून २०२६ असून मतदान १८ जून २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४) यावेळेत आहे.मतमोजणी आणि निकाल २२ जून २०२६ रोजी आहे.

या निवडणुकीत आतापर्यंत सांगली जिल्ह्याचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणानंतर सातारा जिल्ह्यातील नेत्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. सातारा जिल्ह्याला उमेदवारी मिळावी म्हणून स्थानिक नेते मंडळी जोरदार प्रयत्न करत आहेत 

 सांगली-सातारा जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांकडून दावा केला जाऊ शकतो. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी निर्माण झालेली अंतर्गत बंडाळी आणि स्थानिक समीकरणांमुळे महायुतीची ताकद एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान वरिष्ठ नेतृत्वासमोर असेल. भाजपसाठी ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनी मोठी तयारी सुरू केली आहे. मागील निवडणुकीत त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या जागेवर जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यांच्याकडून पण अनेक जण इच्छुक आहेत.दोन्ही जिल्ह्यांतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील मतांची जुळवाजुळव करून भाजपला तगडे आव्हान देण्याची तयारी सुरू आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत दुखावलेला शिवसेना {एकनाथ शिंदे गट} काय भूमिका घेणार हेही निर्णायक  ठरणार आहे ते भाजप बरोबर राहणार की महाविकास आघाडी बरोबर राहणार यावरही निवडणुकीचे बरेचसे चित्र अवलंबून राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस {अजित पवार गट} जर भाजप बरोबर राहिला तर ही निवडणूक भाजपला एकतर्फी होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस {अजित पवार गट} आणि शिवसेना {एकनाथ शिंदे गट} हे महाविकास आघाडी सोबत एकत्र आले तर निवडणूक अतिशय रंगतदार आणि चुरशीची होणार आहे.

पावसाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि सांगली-सातारा मतदारसंघाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत यांचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य यांना मतांचा अधिकार असणार आहे.

उपलब्ध आकडेवारीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षीय ताकद पुढीलप्रमाणे 

🔸 भाजप — 232

🔸 शिवसेना (शिंदे गट) — 60

🔸 राष्ट्रवादी काँग्रेस — 120

🔸 काँग्रेस — 53

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) — 85

🔸 स्थानिक आघाडी व इतर — 47

या आकडेवारीवरून भाजपा महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक आघाड्या आणि अपक्षांची भूमिका देखील निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button