फलटण: — सहकारी चळवळीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या फलटण तालुक्यातील सहकारी संस्थांच्या कथित डबघाईला आणि मनमानी कारभाराला माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट रामराजे आणि त्यांच्या भावंडांना जबाबदार धरले आहे. अत्यंत खरमरीत आणि आक्रमक शब्दांत प्रहार करताना रणजितदादांनी आरोप केला की, “रामराजे व त्यांच्या भावंडांचा सहकारी संस्थांना मोठा शाप लागला असून, यांची ही अशी कीड आहे जी या संस्थांना दिवसेंदिवस पोखरून खात आहे.”
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सहकारी संस्थांच्या भवितव्यावर चिंता व्यक्त करताना विरोधकांच्या कारभाराचे वाभाडे काढले. “या मंडळींचा सगळंच भाड्याने देण्याचा कार्यक्रम सुरू आहे. श्रीराम कारखाना, मालोजी बँक, डेअरी हे सर्व स्वतः काहीही चालवू शकत नसल्यानेच ते भाड्याने देण्याचा घाट घातला जात आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. स्वतःच्या अकार्यक्षमतेमुळेच या सर्व संस्था डबघाईला नेल्या जात आहेत, असा दावाही त्यांनी केला.
प्रति टन २०० रुपयांची खाबुगिरी आणि खाजगीकरणास तीव्र विरोध
विशेषतः कारखान्याच्या भाड्याच्या आणि आर्थिक व्यवहारांवर रणजितदादांनी जोरदार टीका केली. “जगामध्ये हा एकमेव असा साखर कारखाना असेल की त्याचे भाडे हे काळाप्रमाणे वाढण्याऐवजी त्यात कायम घटच होत आली आहे. खऱ्या अर्थाने या भाड्यात वाढ झाली पाहिजे होती, परंतु तसे न होता प्रत्येक टनाच्या मागे हे २०० रुपये खात आले आहेत,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
सहकार क्षेत्र टिकवण्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना ते म्हणाले की, “कोणत्याही ‘सहकारी’ संस्थेला आपला कारखाना चालवायला देण्यास आमची काहीही हरकत नाही, परंतु हा कारखाना ‘खाजगी’ करण्याच्या त्यांच्या कोणत्याही मनसुब्यांना आमचा कायम व तीव्र विरोधच असणार आहे.”
’स्वराज’च्या प्रगतीमुळे पोटशूळ; शेतकऱ्यांच्या बिलांवर ठोस आश्वासन
उपळवे येथील स्वराज कारखान्याच्या प्रगतीवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला रणजितदादांनी चोख प्रत्युत्तर दिले. “उपळवे कारखाना हा माझ्या आजोबांनी उभा केला नाही, तर तो मी स्वतःच्या हिमतीवर उभा केला आहे. आज फलटण तालुक्यातील सर्वाधिक उसाचे गाळप आपला स्वराज कारखाना करतो. यांनी वडिलोपार्जित संस्था मोडून खाल्ल्यामुळे, आम्ही हिमतीने उभा केलेला विकासाचा हा डोंगर आणि स्वराज कारखाना यांच्या पोटात दुखत आहे,” असा घणाघाती टोला त्यांनी लगावला.
शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलाबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. “स्वराज कारखान्याकडे कुणाचेही पेमेंट कधीही राहिले नाही आणि राहणारही नाही. जर स्वराजचे पेमेंट थकीत असते, तर जनतेने तुमच्या तोंडाला काळे फासून तुम्हाला कधीच घरी बसवले नसते,” असे त्यांनी स्पष्ट केले.
१२४ कोटींचे भुयारी गटार कुठे गेले? आणि कै. हणमंतराव पवारांचे निधन
नगराध्यक्षांवर १५% कमिशनचा खोटा आरोप करणाऱ्यांचाही रणजितदादांनी समाचार घेतला. “१५ टक्क्यांचे आरोप करणाऱ्यांनी आधी सांगावे की, फलटण शहराचे १२४ कोटींचे भुयारी गटार कुणी गायब केले? आणि त्यानंतरच खोट्या वलग्ना कराव्यात,” असा थेट सवाल त्यांनी विचारला.
श्रीराम कारखाना बंद पडण्याच्या ऐतिहासिक परिस्थितीचा पर्दाफाश करताना ते म्हणाले की, “श्रीराम मंदिरात मीटिंग घेऊन, झोन बंदी उठवून श्रीराम कारखाना त्यावेळी कोणी बंद पाडला? या सगळ्या दबावातूनच कै. हणमंतराव पवार यांचे अपघाती निधन झाले. हे पाप आणि हा इतिहास इथली जनता कधीही विसरणार नाही.”
स्वतःच्या कुटुंबाला पहिल्या नोकऱ्या; तरुणांवर अन्याय
तालुक्यातील तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सडकून टीका केली. “महिंद्रा नावाचे गोडाऊन स्वतःच्या पुत्रासाठी फलटणमध्ये आणले व त्यामध्ये पहिले काम हे स्वतःच्या पुत्राला दिले. तर कमिन्समध्ये पहिले काम हे स्वतःला ‘श्रीमंत’ म्हणवून घेणाऱ्यांनी स्वतःच्या मुलीला दिले. तालुक्यातील बेरोजगार युवक हा दुजाभाव आणि स्वार्थ कधीही विसरू शकणार नाहीत,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
कितीही जादूटोणा करा, सूर्य उगवायचा राहणार नाही!
विरोधकांच्या कारवायांवर ठाम विश्वास व्यक्त करताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेवटी ठाम विश्वास व्यक्त केला की, “यांनी कितीही जादूटोणा केला तरी सुद्धा सूर्य हा उगवायचा राहणार नाही. फलटण तालुका हा राज्यातील सर्वात प्रगत तालुका आपण करून दाखवणारच, त्यासाठी फलटणची जनता हि आमच्यासोबत आहे.”