फलटण:–नीरा देवघर, भाटघर आणि गुंजवणी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील ४ ते ५ तासांत वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात केव्हाही पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठच्या गावांना आणि नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरणाची सद्यस्थिती (दिनांक ०८/०७/२०२६ रोजी दु. २.०० वाजेपर्यंत):पाणी पातळी: ५७८.७५ मीटरउपयुक्त पाणीसाठा: ८.२१ टीएमसी (TMC) असून एकूण टक्केवारी: धरण ८७.२७% भरले आहे.
नीरा उजवा कालवा विभाग, फलटणचे कार्यकारी अभियंता रा. पो. मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणातील पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील काही तासांत नदीपात्रात विसर्ग सुरू केला जाईल.
वीर, फलटण, माळशिरस, माचणूर व पंढरपूर येथील सहाय्यक अभियंता श्रेणी १, उपविभागीय अभियंता आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना तात्काळ आवश्यक ती काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नदीकाठच्या नागरिकांनी पात्रात उतरू नये, जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे आणि प्रशासनाकडून येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी होणार नाही असे आवाहन केले आहे.