फलटण – फलटण येथील नागरिक अय्याज इक्बाल कोतवाल यांनी फलटण नगर परिषद प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराविरुद्ध आणि संशयास्पद आर्थिक अपहाराविरोधात दि २१ जुलै रोजी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. मालमत्ता कराच्या चेकचा अपहार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
सध्या नगरपालिकेमध्ये कर घोटाळा प्रकरण गाजत आहे नगरपरिषदेच्या ढिसाळ आणि संशयास्पद कारभाराचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. फलटण येथील रहिवासी अय्याज इक्बाल कोतवाल यांनी आपल्या मालमत्ता करापोटी भरलेल्या ₹२०,००० च्या चेकचा पालिकेने अपहार केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. वारंवार दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कोतवाल यांनी थेट २१ जुलै २०२६ पासून मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा आक्रमक इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
अय्याज कोतवाल यांनी २३ मार्च २०२४ रोजी त्यांच्या मालमत्ता क्र.W3BZ3000596 व W3BZ3000597 च्या करापोटी ₹२०,००० चा चेक पालिकेकडे जमा केला होता. मात्र, हा चेक त्यांच्या नावावर नसलेल्या भलत्याच (क्र. W3BZ3000504) मालमत्तेच्या नावावर जमा दाखवून पालिकेने खोटे उत्तर दिल्याचा आरोप आहे.
आपल्या हक्काच्या पैशांची पावती न मिळणे आणि दुसऱ्याच मालमत्तेच्या नावावर रक्कम दाखवली जाणे, हा सरळ-सरळ पैशांचा अपहार असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.
येत्या ८ दिवसांच्या आत या रकमेची पावती आपल्या मूळ मालमत्ता करात जमा करावी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दि.२१ जुलैपर्यंत न्याय न मिळाल्यास ते कोणत्याही क्षणी आत्मदहन करतील आणि या आत्मदहनानंतर फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारीच यासाठी जबाबदार असतील, असा इशारा दिला आहे. एवढेच नव्हे तर, आत्मदहनानंतर मुख्याधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.
स्थानिक पोलिसांनाही पत्राची प्रत पाठवून जी.वि.शा/आत्मदहन नियमानुसार तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता या गंभीर इशाऱ्यानंतर सुस्त फलटण पालिका प्रशासन जागे होणार की आंदोलनाची वाट पाहणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.