फलटण — फलटण तालुक्याला हवाई नकाशावर आणण्यासाठी आणि दळणवळणाला नवी गती देण्यासाठी नियोजित फलटण विमानतळ प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र विमान प्राधिकरणाचे अधिकारी कुणाल देसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण (Presentation) केले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे फलटणचा नवीन विमानतळ नुकतेच मंजूर झाले आहे. हवाई मार्गाशी आता फलटण जोडले जाणार आहे. फलटण येथे नवीन नियोजित विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने विमान प्राधिकरणाकडून आखणी व आराखडा मुख्यमंत्री यांच्या समोर सादर करण्यात आला.
या प्रसंगी पंचायत राज व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, आमदार धैर्यशील कदम, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते आणि सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत, विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
विमानतळ प्रकल्पामुळे फलटणसह आसपासच्या परिसरातील उद्योग, कृषी निर्यात आणि पर्यटनाला मोठा वाव मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे फलटणच्या विकासाला चौफेर अधिक गती मिळणार असल्याने याबाबत सर्व परवानक्या विषयी सहकार्य करण्याची विनंती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मतदारसंघाविषयी असलेल्या तळमळीचे कौतुक करून लवकरात लवकर फलटण हवाई नकाशावर येईल अशी ग्वाही दिली.
Back to top button
