स्थानिक

फलटण नगरपालिकेच्या नव्या व्यावसायिक संकुलास ‘आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक’ यांचे नाव देण्याची रामोशी समाजाची मागणी; मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले  निवेदन

​फलटण :-ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवणारे महाराष्ट्रातील पहिले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या शौर्य आणि त्यागाचे स्मरण म्हणून, फलटण नगर परिषदेच्या इमारतीशेजारील (जुनी बाग) नव्याने उभारण्यात येत असलेल्या भव्य व्यावसायिक संकुलास “आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक व्यावसायिक संकुल” असे नाव देण्यात यावे, या मागणीचे निवेदन समस्त फलटण तालुका रामोशी समाजाच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव आणि नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर  यांना देण्यात आले.

​भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुभाष गुळवे, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ मदने आणि सामाजिक कार्यकर्ते रुपेश मदने यांच्या पुढाकाराने व प्रमुख उपस्थितीत हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी अन्यायकारक ब्रिटिश राजवटीविरुद्ध सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आणि स्वाभिमानासाठी आपला देह झिजवला. त्यांचा हा जाज्वल्य इतिहास पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा आणि त्यांच्या कार्याला योग्य सन्मान मिळावा, यासाठी पालिकेच्या या नव्या वास्तूला त्यांचे नाव देण्याचा ठराव नगर परिषदेने तातडीने मंजूर करावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देण्यासोबतच, नगरपालिकेच्या प्रांगणात पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याशी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाबाबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या स्मारकाचे लवकरात लवकर भव्य सुशोभीकरण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.

​या प्रसंगी रामोशी समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर परिषदेने या दोन्ही मागण्यांची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी नगरसेवक रोहित नागटिळे, नगरसेविका सिद्धाली शहा, माजी नगरसेवक अनुप शहा, अजित गायकवाड आदी उपस्थित होते 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button