फलटण नगरपालिकेत ‘पती-राजां’ची दादागिरी अन् हुकूमशाही मोडणार! मुख्याधिकाऱ्यांचे सडेतोड लेखी आदेश: महिला नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपावर बंदी! ढवळाढवळ थांबणार

फलटण:—
फलटण नगरपालिकेच्या अधिकृत बैठका आणि प्रशासकीय कामकाजात महिला सदस्यांच्या पतींचा तसेच नातेवाईकांचा वाढता हस्तक्षेप अन् अधिकाऱ्यांवर आणला जाणारा बेकायदेशीर दबाव यावर अखेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रशासकीय चाबूक उगारला आहे. महिला लोकप्रतिनिधींच्या नावाखाली पती आणि नातेवाईक नगरपालिकेत येऊन कर्मचाऱ्यांना धमकावणे, दादागिरी करणे आणि अपमानास्पद वागणूक देणे यांसारख्या गंभीर प्रकारांची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी थेट कारवाईचा इशारा देणारा कडक आदेश जारी केला आहे.
फलटण नगरपालिकेच्या कारभारात बाहेरच्या व्यक्तींचा, विशेषतः महिला सदस्यांच्या पतींचा, प्रतिनिधींचा व नातेवाईकांचा थेट हस्तक्षेप होत असल्याच्या अनेक तक्रारी आणि प्रकार समोर आले होते. कोणतीही शासकीय किंवा कायदेशीर परवानगी नसताना हे ‘पती-राजे’ नगरपालिकेत दिवसभर ठाण मांडून बसणे, कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, प्रशासनावर दबाव आणणे आणि अधिकाऱ्यांचा उपमर्द करण्याचे प्रकार सातत्याने करत होते.
या संपूर्ण प्रकाराला चाप लावण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी शासन परिपत्रकांचा संदर्भ देत कार्यालयीन आदेश (जा.क्र.फनप/१९३७/२०२६, दिनांक ११/०९/२०२६) काढून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत:
फलटण नगरपालिकेच्या कोणत्याही अधिकृत बैठकीत किंवा कामकाजात महिला सदस्यांचे पती, नातेवाईक अथवा प्रतिनिधी यांना उपस्थित राहता येणार नाही व हस्तक्षेप करता येणार नाही. अशा कोणत्याही बाह्य व्यक्तीने कामकाजात अडथळा किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याची लेखी नोंद करून थेट नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे अहवाल सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.
कायदेशीर अधिकार नसताना बाहेरील व्यक्तींना कार्यालयीन माहिती देणे किंवा त्यांच्या दबावाखाली काम करणे पूर्णपणे बेकायदेशीर असून शिस्तभंगाची बाब मानली जाईल.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगविषयक कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या या धडक निर्णयामुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात आणि पालिकेच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पालिकेचा कारभार हाकणाऱ्या आणि अधिकाऱ्यांवर दमदाटी करणाऱ्या तथाकथित राजकीय नेत्यांचे आणि पतींचे धाबे दणाणले आहेत.
लोकशाहीत निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना स्वावलंबनाने काम करू न देता त्यांचा कारभार स्वतःच्या हातात घेणाऱ्या ‘पती-राजां’ना या आदेशामुळे सणसणीत चपराक बसली आहे. आता या कडक आदेशाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होते, याकडे संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे.

फलटण नगरपालिकेत यापूर्वी बाहेर व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे अनेक अधिकारी कर्मचारी यांना कामे करताना अडचणी येत होत्या. नगरसेवकांचे पती किंवा त्यांचे नातेवाईक नगरपालिकेत वारंवार येऊन ती या मांडून बसणे कामकाजात हस्तक्षेप करणे असे प्रकार करत होते. या प्रकाराला अधिकारी व कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक सुद्धा कंटाळा येतो आता मुख्याधिकारी यांनी मोठ्या धाडसाने लेखी पत्र काढल्याने याला आळा बसेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


