पुणे : परदेशातील उत्तम नोकरी, आकर्षक वेतन आणि उच्च पदाची संधी असतानाही समाजातील युवकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा मनाशी बाळगून मायदेशी परतलेल्या फिरोज जानमहंमद शेख यांच्या कार्याचा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
फलटण तालुक्यातील सोनवडी बु. II या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या व गेली बावीस वर्षांपासून पुण्यातील कात्रज येथे स्थायिक असलेले फिरोज शेख यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी जीवनप्रवास घडवला. सरकारी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी MBA आणि ISO Auditor ही अतिरिक्त पात्रता मिळवली.
शिक्षणानंतर भारतात व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात करत त्यांनी पुढे दुबई आणि सौदी अरेबिया येथे विविध जबाबदारीच्या पदांवर काम केले. तब्बल 24 वर्षांचा व्यावसायिक अनुभव घेताना त्यांनी फॅक्टरी मॅनेजरसह विविध उच्च पदांवर जबाबदारी सांभाळली.
मात्र परदेशातील स्थिर आणि सुखकर जीवनापेक्षा आपल्या देशातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि कौशल्य विकासासाठी मदत करणे, या सामाजिक उद्देशाला त्यांनी प्राधान्य दिले. कुटुंबासह परदेशात वास्तव्यास असतानाही त्यांनी नोकरीचा निर्णय बदलून 2019 मध्ये भारतात परतण्याचा धाडसी निर्णय घेतला.
भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षण, रोजगार आणि करिअर मार्गदर्शन या क्षेत्रात कार्य सुरू केले. आज ते मल्टी जिनीयस प्रोफेशनल्स प्रा. लि. (पुणे व लंडन) चे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच जिनीयस प्रोफेशनल्सचे CEO म्हणून कार्यरत आहेत.
गेल्या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या माध्यमातून 900 हून अधिक व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, 3000 हून अधिक युवक आणि नागरिकांना शिक्षण, करिअर, व्यवसाय व रोजगाराच्या विविध विषयांवर मार्गदर्शन मिळाले आहे.
केवळ रोजगार क्षेत्रापुरते त्यांचे कार्य मर्यादित राहिलेले नाही. अल्पवयीन गुन्हेगारीकडे वळलेल्या मुलांचे समुपदेशन करून त्यांना शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष उपक्रम राबवले आहेत. युवकांना योग्य दिशा देण्याबरोबरच व्यवसाय मार्गदर्शन आणि विविध विषयांवरील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
पुणे आणि लंडन येथे कार्यालयांच्या माध्यमातून त्यांच्या संस्थेचे कार्य सुरू असून, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक योगदानाची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
परदेशात मिळालेले यश आणि उच्च पदाची कारकीर्द मागे ठेवून युवकांच्या भवितव्यासाठी मायदेशी परतण्याचा निर्णय घेतलेल्या फिरोज शेख यांच्या कार्याचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते झालेला सन्मान त्यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल घेणारा ठरला.