स्थानिक

भक्तीचा महासागर! संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे फलटणनगरीत अभूतपूर्व स्वागत; दर्शनासाठी भाविकांची अथांग गर्दी. ‘ज्ञानोबा-माऊली’च्या जयघोषात वैष्णवांचा मेळा अवतरला 

फलटण:— महानुभाव पंथीयांची आणि जैन धर्माची दक्षिण काशी म्हणून ऐतिहासिक ओळख असलेल्या फलटण नगरीत आज वैष्णवांचा मेळा अवतरला. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शहरात अत्यंत उत्साही, मांगल्यमय आणि भक्तीभावाने ओतप्रोत अशा वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. माऊलींच्या दर्शनासाठी फलटणकरांनी आणि परिसरातील लाखो भाविकांनी अभूतपूर्व गर्दी केली होती.

अध्यात्म आणि इतिहासाचा वारसा लाभलेल्या फलटण नगरीत माऊलींची पालखी येताच संपूर्ण शहर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषाने आणि टाळ-मृदंगाच्या गजराने दुमदुमून गेले.

 पालखी मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ढोल-ताशांचा गजर, ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी यामुळे सोहळ्याची भव्यता अधिकच खुलून दिसत होती.

 माऊलींचे पाऊल फलटण शहराच्या हद्दीत जिंती नाका जवळ पडताच नगरपालिकेच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर मुख्याधिकारी निखिल जाधव सर्व नगरसेवक यांनी स्वागत केले. शहरात पालखी मार्गावर दर्शनासाठी अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली. डोळ्यांत विठूरायाची आस आणि मुखात माऊलींचे नाव घेत लाखो भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले.

 येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरासमोर पालखी येताच राजघराण्याच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर,पंचायत समितीमाजी सभापती विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक निंबाळकर या राजघराण्यातील मान्यवरांनी माऊलीचे स्वागत केले.

 वाढती गर्दी लक्षात घेता पालखी मार्गावर आणि विविध चौकामध्ये प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त आणि स्वयंसेवकांचे चोख नियोजन करण्यात आले होते.

 माऊलीच्या सेवेसाठी विविध ठिकाणी सामाजिक संस्था गणेशोत्सव मंडळे विविध संस्था यांनी अन्नदानाचे आणि नाश्त्याचे चांगले नियोजन केले होते अनेकांनी आरोग्य शिबिराचे सुद्धा आयोजन केले होते. माऊलींचे सेवेसाठी मोफत दाढी, फूट मसाज या सेवा सुद्धा देण्यात आल्या होत्या. 

“ज्ञानोबा माऊली…” च्या जयघोषात आणि वारकऱ्यांच्या पवित्र ऊर्जेने फलटण नगरीचा कण अन् कण भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला आहे.

भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून फलटण नगरपालिकेने अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले होते तसेच शौचालयाची मोठ्या प्रमाणात सोयी केलेली होती शहरात सर्वत्र स्वच्छतेचे वातावरण होते शहरातील पालखी मार्गावरील खड्डे बुजवण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button