स्थानिक
गुरु पौर्णिमेनिमित्त परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांच्या अमृतमय आणि अनमोल वाणीतून झालेल्या ओघवत्या प्रवचनाने उपस्थित हजारो भाविक मंत्रमुग्ध

फलटण – फलटणमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ शिवाजीराव बुधवार पेठ यांच्यातर्फे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या दिमाखात पार पडला परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांच्या प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.गुरु-शिष्य नात्याची महती आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकीत त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती.
आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा! अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवणाऱ्या सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा परमपवित्र सण फलटण शहरात श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ शिवाजी रोड बुधवार पेठ फलटण यांच्यातर्फे अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात नवलबाई मंगल कार्यालय फलटण येथे साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांची लाभलेली वंदनीय उपस्थिती. त्यांच्या अमृतमय आणि अनमोल वाणीतून झालेल्या ओघवत्या प्रवचनाने उपस्थित हजारो भाविक पारमार्थिक आनंदाने न्हाऊन निघाले.

प्रवचनाची सुरुवात करताना परमपूज्य राजनकाका देशमुख महाराजांनी गुरुतत्त्वाचे मानवी जीवनातील स्थान विशद केले. ते म्हणाले, “गुरु हे केवळ एखादी व्यक्ती नसून ती एक अखंड वाहती चैतन्यशक्ती आहे. शिष्याच्या जीवनाला योग्य आकार देऊन त्याला संसारातील मोहापासून मुक्तीकडे आणि अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेण्याचे कार्य सद्गुरू करतात.”
गुरु आणि शिष्याच्या अलौकिक नात्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हे नाते भौतिक जगातील इतर संबंधांसारखे नसून ते पूर्णतः श्रद्धा, समर्पण आणि निस्सीम विश्वासावर टिकून असते. शिष्याने गुरुचरणी पूर्ण समर्पण केले की, सद्गुरू त्याचा योगक्षेम स्वतः वाहतात, असा मौलिक संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
आपल्या प्रवचनात देशमुख महाराजांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिव्य जीवनकार्याचा, त्यांच्या अगाध लीलांचा आणि शिकवणीचा विशेष उल्लेख केला.’भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ हा स्वामींचा अमर संदेश मानवी जीवनात कोणत्याही बिकट प्रसंगी कसा ध्येयधैर्य देणारा ठरतो, हे त्यांनी समर्पक उदाहरणांद्वारे समजावून सांगितले.
स्वामी समर्थांवर ठेवलेली दृढ श्रद्धा माणसाला मोठ्या अध्यात्मिक आणि व्यावहारिक संकटांतून पार पाडते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.नामस्मरणाचे महत्त्व सांगताना त्यांनी सर्वांना दैनंदिन जीवनात जप आणि भक्तीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले.
यावेळी परमपूज्य नवनाथ शेलार महाराज यांचेही प्रवचन झाले. या कार्यक्रमात परमपूज्य राजनकाका देशमुख महाराज यांचे नातू राजवर्धन राहुल देशमुख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच रक्षक रयतेचा न्यूज तर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त राजनकाका देशमुख महाराज यांच्यावर काढण्यात आलेल्या विशेषांकाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले.

गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच फलटण येथील उत्सवस्थळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.प्रवचनानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

परमपूज्य राजन काका देशमुख महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे विचार श्रवण करण्यासाठी फलटण शहरासह आसपासच्या ग्रामीण भागातून भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. संपूर्ण परिसर “श्री स्वामी समर्थ” आणि “गुरुमाऊलींच्या” जयघोषाने दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते, ज्यामुळे सोहळा अत्यंत शांततेत आणि भक्तिभावाने पार पडला.



