रक्षक रयतेचा न्यूज नेटवर्क
पुणे: पालखी मार्गावरील दिवे घाट तसेच घाटाच्या अलीकडची कामे त्वरित पूर्ण करावीत. घाटांमधील चढ-उतार कमी करावेत पालखीच्या अगोदर कामे उरकून घेण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केल्या.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिवेघाटाची (ता. पुरंदर) प्रत्यक्ष पाहणी केली. पालखी सोहळा सुखकर व्हावा आणि भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी कामाचा वेग वाढवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
कामाचा दर्जा आणि सुरक्षा: दिवेघाटातील धोकादायक वळणे आणि तेथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन गडकरी यांनी मार्गाच्या रुंदीकरणाची आणि संरक्षक भिंतींच्या कामाची पाहणी केली.
“पालखी मार्ग हा केवळ रस्ता नसून भक्तांच्या श्रद्धेचा विषय आहे,” असे सांगत त्यांनी वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, शौचालय आणि विश्रांतीसाठी असलेल्या सोयीसुविधांची माहिती घेतली.
घाटातील चढ-उतार कमी करणे आणि पावसाळ्यात दरडी कोसळणार नाहीत, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अभियंत्यांना दिल्या.
पाहणी दरम्यान काही ठिकाणी कामाची गती मंद असल्याचे दिसून आल्यावर गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. उपस्थित नागरिकांच्या तक्रारीची पण त्यांनी दखल घेऊन सूचना केल्या. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
“वारकरी संप्रदायासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गाचे काम जागतिक दर्जाचे व्हावे आणि पालखी सोहळ्यावेळी वारकऱ्यांच्या पायाला साधा खडाही लागू नये, अशी आमची भावना आहे.”
— नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री