Uncategorized
ठेकेदार उकरतोय नुसताच रस्ता, जनतेला बसतोय फटका, रस्त्याच्या एक ना धड भराभर चिंद्या. रस्ते कामात नियोजनाचा अभाव, एकही रस्ता व्यवस्थित पूर्ण नाही
सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही गप्प
फलटण{नसीर शिकलगार }- फलटण शहरात पालखी मार्ग अंतर्गत रस्त्याचे कामे सुरू असून संबंधित ठेकेदाराकडे नियोजनाचा अभाव असल्याने अनेक कामे अपूर्ण आहेत. सदरचा ठेकेदार रस्त्याची कामे मध्येच अपूर्ण ठेवून दुसरे रस्ते उकरत बसला असून नागरिक हैराण आणि त्रस्त झाले आहेत. अनेकांचे अपघात होत असून अनेक मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.

फलटण शहरामध्ये सध्या पालखी मार्गाचे काम सुरू आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असल्याने फलटण शहर रस्त्याच्या बाबतीत निश्चितच कात टाकणार आहे. शहरात दर्जेदार रस्ते व्हावे म्हणून लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असताना ठेकेदारांच्या नियोजन शून्य आणि मनमानी कारभारामुळे फलटणमध्ये रस्ते मृत्यूचे सापळे बनले आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शहरात पालखी मार्ग मंजूर करून त्यासाठी निधी आणला. जवळपास दीड वर्षांपूर्वी विमानतळापासून पालखी मार्गाचे काम सुरू झाले. तेथील रस्ता उखडण्यात आला. मात्र दीड वर्षे उलटले तरी अद्याप तेथील रस्ता व्यवस्थित झालेला नाही. अनेक कामे अपूर्ण असून वारंवार अपघात घडत आहेत. फलटण शहरात सुद्धा अनेक ठिकाणी रस्ते उखडले असून जेथे रस्ते उखडले आहेत तेथील काम शंभर टक्के पूर्ण करून नवीन कामाला हात घातला पाहिजे. मात्र निम्म्याच्या वर काम आले की ठेकेदार दुसरा रस्ता उकरत बसत आहे.
शहरात आज काही भागात रस्ते पूर्ण झाले असले तरी जेथे रस्ते पूर्ण आहे तेथे संरक्षणाच्या दृष्टीने काहीही उपाययोजना नाहीत. अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून झाडे सुद्धा लावण्यात आलेली नाहीत . जेथे वाहतूक जास्त आहे.तेथील काम प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे आहे मात्र तेथेही काम अपूर्ण ठेवून दुसरे कामे सुरू आहेत. रस्ते उकरा उकरी मुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून अनेक वाहन चालक लांबचा वेढा घालून इच्छे स्थळे जात आहे. या कामामुळे अनेकांचे अपघात झाले असून याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महात्मा फुले चौकामध्ये तीन बाजूने रस्ता पूर्ण केला आहे मात्र पुतळ्याच्या अवती भोवती तसेच खड्डे ठेवले असल्यामुळे तसेच गजानन चौकाकडचा रस्ता उकरल्यामुळे येथेही वारंवार वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
शहरातील एसटी स्टॅन्ड आणि महावीर स्तंभ जवळ पण प्रचंड वाहतूक कोंडी दररोज होत आहे. काम सुरू असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावणे आणि दिशादर्शक फलक लावणे कंत्राटदारावर बंधनकारक असते.रस्ता पूर्णपणे सुकेपर्यंत (किमान १५-२० दिवस) त्यावर जड वाहने सोडण्यास मनाई असते. ठराविक तापमानातच रस्ता करणे गरजेचे असते मात्र हे होत नाही. अधिकारी वर्ग कसलेच लक्ष देत नाही. महात्मा फुले चौक ते श्रीमंत मालोजीराजे पुतळा दरम्यानचा रस्ता व्यवस्थित झालेला नाही. त्याला पाणी निचरा करण्यासाठी सोय केलेली नाही. रस्ता करताना महात्मा फुले शॉपिंग सेंटर चा खोलगट भाग लक्षात घेतलेला नाही.जर मोठा पाऊस झाला तर खाऊगल्ली आणि महात्मा फुले शॉपिंग सेंटर आवारात गुडघाभर पाणी घुसणार आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर व्यवस्थित पाणी मारलेले नाही. रस्त्याच्या कामामुळे अनेकांचे व्यवसाय बंद असून पूर्ण काम करूनच त्याने दुसरा रस्ता हाती घेतला पाहिजे मात्र संबंधित ठेकेदारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने तो कसाही उठसुट रस्ता उकरत बसलेला आहे याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत असून वाहनधारक तर मेटाकुटीला आले आहेत. चांगले व दर्जेदार रस्ते व्हावे अशी सर्वांचे भावना आहे मात्र ठेकेदार चुकीचा वागत असताना त्याला समज देण्याचे काम कोणताच अधिकारी तसेच सत्ताधारी असो किंवा विरोधी असो कोणीच करत नाही. योग्य नियोजन करून रस्ते पूर्ण करावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




