फलटण – चारही बाजूने महामार्गांच्या जाळ्यामुळे फलटणची ओळख आता बदलत आहे.नवीन मुंबई ते बेंगलोर हा महामार्ग फलटण जवळूनच जाणार आहे.दळणवळण सुलभ झाल्यामुळे या भागातील रोजगार,उद्योग आणि कृषी क्षेत्राला मोठी गती मिळणार असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (१४ मे २०२६) फलटण येथे पालखी महामार्गाच्या कामाची पाहणी केली आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खा. धैर्यशील मोहिते पाटील माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील आमदार अभिजित पाटील राष्ट्रीय महामार्गाचे विविध अधिकारी तसेच स्थानिक सर्व अधिकारी उपस्थित होते.
आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर या पालखी मार्गाचे काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले असून जर कोठे निकृष्ट दर्जाचे काम आढळून आले तर संबंधित ठेकेदाराला आपण काळ्या यादीत टाकणार आहोत. पालखी मार्ग हा हिरवागार असावा यासाठी लोकप्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांनी महामार्गाच्या कडेने वृक्षारोपण कार्यक्रम राबवावा. पालखी मार्गाच्या दिवे घाटातील कामाबाबत आपण सखोल पाहणी केली असून येत्या चार ते पाच महिन्यात हडपसर ते दिवेघाट या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत.
माझी आई मृत्यूपूर्वी सहा महिन्या अगोदर पंढरपूरलादेव दर्शनासाठी आली होती त्यावेळी या भागातील रस्ते पाहून तिने नाराजी व्यक्त केली होती व मला त्यावेळी चांगले रस्ते बनव असे सांगितले होते.माझ्याकडे मंत्रिपद येतात मी रस्त्यांच्या कामाला गती दिली असून माझ्या स्वप्नातील पालखी मार्ग आज चांगल्या पद्धतीने आकारास येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
फलटणमधील रस्त्याबाबत यापूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण केल्या असून त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी आवर्जून सांगितले.
भविष्यातील प्रकल्पांबद्दल बोलताना ‘मल्टी-लेन फ्री फ्लो’ (MLFF) टोलिंग सिस्टिम आणि रस्ते सुरक्षेवर भर दिला. तसेच, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जलसंधारण आणि रस्ते बांधणी यांचा समन्वय साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
मंत्री नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी फलटण येथील नीरा कालव्यावरील पुलाची (UHPFRC) विशेष पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेला हा पूल दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
या दौऱ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गडकरींनी त्यांच्या ताफ्यात ५०% कपात केली. पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार इंधन बचत आणि सामान्य नागरिकांना होणारा वाहतुकीचा त्रास टाळण्यासाठी त्यांनी स्वतः अधिकृत वाहनांऐवजी बसने प्रवास करणे पसंत केले. त्यांच्यासोबत अधिकारी आणि पत्रकारही या बसमधून सहभागी झाले होते.