फलटण :सामाजिक क्रांतीचे आद्यप्रणेते क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

जयंतीनिमित्त सकाळच्या सत्रात महिलांची भव्य क्रांतिरॅली काढण्यात आली. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ होत समाजजागृतीचा संदेश देत होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या वतीने नागरिकांसाठी थंड पेयांचे वाटप करण्यात आले.
क्रांतिभूमी महात्मा फुले चौक येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यास राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मान्यवरांसह पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.सकाळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी तर सायंकाळी विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी तसेच कृष्णात चोरमले यांनीही पुतळ्यास अभिवादन केले. मंत्री गोरे यांच्या सह यावेळी फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर , गोविंद भुजबळ ,रणजित भुजबळ , बाळासाहेब ननावरे , सागर अभंग , प्रा बाळासाहेब घनवट , शनेश शिंदे , संदीप नेवसे, रोहन शिंदे, राहुल शिंदे , विकास नाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याशिवाय नगरसेवक सुदाम मांढरे, किरण राऊत, संदीप चोरमले, नगरसेविका सुपर्णा अहिवळे, अशोकराव जाधव, सोमाशेठ जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने महात्मा फुले चौकाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. या सजावटीतून महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य, विचार आणि त्यांनी लिहिलेल्या अखंडांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले होते. यामुळे फुलेप्रेमींमध्ये विशेष समाधान व्यक्त करण्यात आले.
यंदाच्या जयंतीचे विशेष आकर्षण म्हणजे “गुलामगिरी” या क्रांतिकारी पुस्तकावर आधारित सेल्फी पॉईंट. महात्मा फुले यांच्या हस्ते ‘गुलामगिरी’ स्वीकारल्याचा देखावा उभारण्यात आला होता. या ठिकाणी युवक-युवतींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सेल्फी घेतले. मंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन पाटील यांनीही या सेल्फी पॉईंटला भेट दिली.
जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
क्रांतिज्योत उपक्रमाने दिला सामाजिक ऐक्याचा संदेश
माळवाडी (ता. फलटण) येथील युवकांनी महात्मा फुले स्मारक ते माळवाडी अशी क्रांतिज्योत नेण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमात शेकडो युवक सहभागी झाले होते. समाजपरिवर्तनाचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष ठरला.
एकूणच विविध उपक्रमांच्या माध्यमातून फलटण शहरात महात्मा जोतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली.
Back to top button
